Sunday, March 6, 2016

एन्ड्युरोचा थरार आणि वाट चुकलेला वाटसरू

खूप दिवसांनी लिहितेय,पण हे सांगायलाच हवं..पुण्यात एन्ड्युरोच्या थरारक स्पर्धेत भाग घेतला तेव्हा एक गोष्ट मनात घर करून राहिली.डोणजे गावातून आम्ही सायकलस्वार निघालो.IBN लोकमतच्या आमच्या तीन टीम मंदार फणसे सरांच्या प्रोत्साहनामुळे सहभागी झाल्या.सायकलींग,माऊन्टन बायकींग आणि ट्रेकिंग..सायकलींगची तयारी जोरदार सुरू होती पण माऊन्टन बायकींगचा अनुभव शून्य होता.त्यानंतर सिंहगड पाऊलवाटेने चढून उतरायचाही होता..पाय-यांच्या सोप्या मार्गाने नाही.तरीही तयार झालो आणि स्पर्धा पूर्ण करायचीच अशी जिद्द उराशी बाळगली.सायकली निघाल्या,आरोळ्या ठोकल्या..अमाप उत्साह आणि अफाट ऊर्जा..सुरुवात तर एक नंबर झाली.
मग चढावर चढ दिसायला लागले..हे होतं माऊन्टन बायकिंग..हा शब्द फार आकर्षक वाटतो पण सायकली उचलत एकेक टप्पा ओलांडणे आणि सायकली दामटवत चढणे हे चांगलंच दम काढणारं होतं.नंतर सुरू झाला चित्तथरारक खेळ...प्रचंड खडबडीत वाळूच्या वाटेवर खोल उतारावर सायकल चालवणे..पडलात तर कपाळमोक्ष किंवा एक फ्रॅक्चर नक्कीच.मग खरा कस लागला सायकलिंग कौशल्याचा...विचार करायला पण उसंत नव्हती..एवढा खोल उतार होता कितीतरी काळ की फक्त बॅलेन्सिंगवर भर देत पुढे जायचं होतं...असे कितीतरी किलोमीटर्स रेटले एकदाचे..खाली आल्यावर वाटलं सुटलो,संपला असावा सायकलिंगचा टप्पा पण कसलं काय नंतर एक पक्का रस्ता लागला..पिक्चर अभी इंटरवल तक भी नही आया था.टळटळीत उन्हात सायकल चालवणं सुरूच होतं.शरीरातले सगळे अवयव बोलू लागले होते पण चले चलो हा मनाचा हिय्या ठाम होता.कसेबसे पुढील 30किमी पार केले..एन्ड्युरोचे volunteers हात करताना दिसले तेव्हा कळलं पहिला टप्पा आपण पार केला.पण खरी लढाई पुढे होती.पाणी पिण्याचा ब्रेक झाला आणि पाच मिनिटांत आमची टीम पुढे निघाली.सिंहगड पाऊलवाटेने चढायला सुरुवात झाली. पुन्हा चले चलो...मग पुढील एक तास गेला..कळस अजूनही खूप लांब होता..दमण्याच्या पलिकडची अवस्था काय असते ते कळायला लागलं होतं.ही सगळी गंमत वरून सूर्यमहाशय एकटक पाहत होते.का आपण हे आव्हान स्विकारलंय,वाटेत मिडियाच्या दुस-या दोन टीम्सने कच खात स्पर्धा सोडून दिल्याचं याचि देही याचि डोळा पाहिलं होतं.ते हुशार होते,त्यांना वेळेत कळलं असेही विचार मनात येऊन गेले.आधीच आपला जीव काय,आपण करतोय काय या सगळ्या विचारांनी मनाला ग्रासलं होतं,तनाची तर विकेट गेली होती.आता चक्कर येणार आणि आपण धीर सोडणार असं वाटत असतानाच तो वाटसरू दिसला आणि डोळे खाडकन् उघडले.साधा शर्ट-पॅण्ट घातलेला एक तिशीतला माणूस अनवाणी उभा होता.शेजारी त्याचे चामड्याचे जीर्ण झालेले बूट.पाय बूट चावल्यामुळे रक्ताळलेला आणि तो क्षणभर विश्रांतीसाठी तसाच उभा.बाकी सगळे स्पर्धक सोडून हा एकटाच असा दिसला मंदार सरांनी त्याची विचारपूस केली तेव्हा कळलं हा बिचारा सिंहगड चुकून या पाऊलवाटेनं चढला.पाय-यांचा सोपा मार्ग त्याला सापडला नाही आणि तो या कठीण मार्गाने निघाला.वाटेत त्याला कळलं आपण साफ चुकलोय.तो आमच्यासारखा स्पर्धेत सहभागी नव्हता ना त्याने आमच्यासारखे सायकलचे हेल्मेट,आदिदासची ट्रॅकपॅण्ट टीशर्ट अन् स्पोर्ट शूज घातले होते.तो आपला सहज सुट्टीच्या दिवशी सिंहगड पहावा म्हणून पहिल्यांदाच आला आणि त्या खडतर वाटेने आणि चामड्याच्या बुटांनी त्याला पुरतं असहाय्य केल.त्यात आणखी एक कळलं त्याच्या पायात दोष होता पण तरीही तो खचला नाही.स्मितहास्य करत तो म्हणाला 'जायेगा,पुरा करेगा'.आणि आम्हाला त्याने स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.कोण होता तो,का भेटला आम्हाला आणि काय उभारी देऊन गेला आम्हाला काय माहीत.त्याला पाणी दिलं आणि आम्ही पुढे निघालो.बाकी कोणतीच मदत त्याला नको होती.त्याला पाहिलं आणि स्पर्धा सोडण्याचे सगळे विचार खळ्ळकन् गळून पडले.आम्ही पुढील अर्धा टप्पा पूर्ण केला आणि परत उतरायला लागलो तेव्हाही आम्हाला तो वाटसरू दिसला.यावेळी त्याच्या चेह-यावर आनंद होता.त्याने गड सर केला तसाच अनवाणी पायांनी आणि आता तो उतरायला सुरुवात करत होता.त्याला सलाम ठोकला आणि आम्ही पुन्हा निघालो झपापझप पुढे.खाली आलो,एन्ड्युरेच्या टीमने जोरदार स्वागत केलं.आमची मित्रमंडळीही आमचं कौतुक करत होती.आमच्यासारख्या beginnersसाठी हा खरंच अत्यंत आनंददायी क्षण होता.आम्ही पहिल्या तीनात बाजी मारली.मेडल मिळालं.सगळं हवं तसं झालं पण लक्षात राहिला तो वाट चुकलेला वाटसरू आणि त्याचा हसरा चेहरा.

No comments: