Monday, August 4, 2008

मुंबई 'अलर्ट'


विश्वासदर्शक ठरावापूर्वीची आणि त्यानंतरची खळबळ ओसरते तोच उडालेलीदुसरी खळबळ..अहमदाबादमधील स्फोटांची मालिका ! त्यानंतर प्रत्येक दिवस दहशतीचा..सुरतही हादरलं..नंतर दहशतवाद्यांची मिळणारी पत्रं जी दिवसागणिकप्रत्येक सामान्याच्या मनात भिती निर्माण करत होती. पुढचं टार्गेट अर्थातच-‘मुंबई’- त्यामुळे मुंबईत सगळीकडे तेव्हापासून हाय ऍलर्ट..सकाळी कामावरजाणारा प्रत्येकजण रात्री सुखरुप परत येईल का याची शाश्वती नाही पण काहीही म्हणामुंबईची जातच वेगळी. कितीही मेघगर्जना झाल्या तरीही त्या घनघोर सरींनान जुमानता कामावर जाणारे हे वेगळ्याच जातकुळीचे मुंबईकर !मी मुळची पुणेकर असूनही स्टारमाझामुळे मुंबईत आले आणि मुंबईचं हे बेधडक वारं माझ्याही अंगात शिरलं.
परवाचीच गोष्ट- अशीच ‘जान हथेली पर’ घेऊन मी लोकलने चर्चगेटला गेले.बरोबर प्रवासाची छोटी बॅग होती .कारण इरादा सीएसटीवरुन डेक्कन क्वीनने पुण्याला जाण्याचा होता.चर्चगेटला उतरले आणि सीएसटीच्या भव्य प्रवेशद्वारात आगमन झाल्यावरआठवलं की बॅग लोकलमध्ये विसरली.मुंबईचा वेग हा तीन मिनीटातच पकडावा लागतोनाहीतर हातात कोलीतच मिळते.त्यामुळे लगेच साक्षात्कार झाला की गेलेली वेळ आणि गेलेली लोकल परत मिळणं ही अशक्यप्राय गोष्ट होती.एकवेळ सावित्रीची प्रार्थना ऐकून यम तिला सत्यवान सोपवेल परंतू गेलेली लोकल मला परत सापडणं शक्यच नाही.हताश होऊन डेक्कन क्वीनचं तिकीट काढते तोच फोन खणखणला-“आपकी बॅग चर्चगेट स्टेशन पर रह गयी है क्या?” –मला वाटलं मला दिवसा स्वप्न पडतंय ..पण गाडीच्या भोंग्याने मला जाणीव करून दिली की जे घडतंय ते वास्तवातच घडतंय.मी तडक आरपीएफ ऑफीस गाठलं.तेथील दृश्य पाहुन दचकले..तिथे तीन-चार कुत्री ज्याला श्वानपथक असं म्हणतात ती माझी छोटीशी बॅग हुंगत होती आणि सुमारे पंधरा पोलीस माझ्याकडे निव्वळ एकाच मुद्रेत पाहत होते ती मुद्रा होती पूर्णतः साशंक !माझे ब्लडटेस्टचे रिपोर्टस त्या बॅगेत असल्यामुळे त्यांना माझा मोबाईल नंबर मिळाला होता आणि त्यांच्यामते माझी ती छोटीशी विनापाश बॅग एक संशयास्पद वस्तू ठरली होती.त्यांच्या दृष्टीने संशयास्पद ठरलेल्या त्या वस्तूत फक्त माझे चार कपडे आणि एक अतिशय मौल्यवान वस्तू होती ती म्हणजे माझ्या आजीची शाल !या मुंबईच्या ‘ऍलर्ट’ने माझी ही किंमती वस्तू मात्र मला परत मिळाली...अर्थातभविष्यात पुन्हा असा विसरभोळेपणा करू नका या ताकदीवर !