Saturday, December 24, 2016

मुलगी आहे ना, मग डान्स क्लासला पाठवामी: 'माझ्या शाळेत उद्यापासून कराटेचा क्लास सुरु होतोय,मला जायचंय.'
आई - 'ओके'

एवढा आणि इतकाच संवाद मी पाचवीत कराटेचा क्लास सुरु करायच्या आधी झाला.आमच्या पुण्यात एकदा एका नातेवाईकांनी खोचकपणे 'अग,भरतनाट्यमचा क्लास लाव ना, कराटे करून काय करणार?'
असं बोलून पाहिलं पण आई माझी ठाम होती, 'ती असलं काही करणार नाही, तिला हवं ते तिला करू दे.' असं लगेच सांगून टाकलं.
बाबांनी तर स्वत:च मला तिसरीत असताना स्विमिंग पूलमध्ये सोडलं आणि नाकातोंडात पाणी जाऊन , आधी पुरती घाबरून,मग सावरून हळूहळू पोहायला शिकले.
आमच्या पुण्यात प्रत्येक पेठेत दोन-तीन भरतनाट्यमचे आणि एखादा कथ्थकचा क्लास होताच, त्यात माझ्या वर्गातल्या काही मुलीदेखील लहानपणापासून या डान्सक्लासला जायच्या.
मला कधीच असं वाटलं नाही. पण पुण्यातील त्या मध्यमवर्गीय कोशात त्यावेळी मुलगी झाली की भरतनाट्यमचा क्लास आणि मुलगा झाला की क्रिकेटला पाठवा, अशी पद्धत तेव्हा होती.
'दंगल' पाहिल्यानंतर मीही हरवून गेले माझ्या बालपणीच्या दिवसांमध्ये.हरयाणा तर दूर राहीलं, पण पुण्यातसुद्धा 'मुलीला कराटे का शिकवताय' वगैरे प्रश्न काही पांढरपेशा चेह-यांना पडायचे आणि माझ्या पालकांनी कधीच त्यांना गंभीरपणे घेतलं नाही याचा मला अभिमान आहे.पाचवी ते दहावी कराटे, स्विमिंग, डॉजबॉल, बॅडमिंटन या सगळ्यांत मी स्वच्छंदीपणे रमले आणि दहावी संपताना ब्लू बेल्ट घेऊन गेले.अकरावीत कॉलेजमधून एनसीसी आणि आतंरमहाविद्यालयीन क्रिकेट सुद्धा खेळले.सगळं उत्तम आणि मजेत सुरु होतं.आई-बाबा आपली मुलगी खेळते पण अभ्यास सुद्धा करतेय ना,मग ठिक आहे यात आनंदी होते.यापलिकडे त्यांनी कधीच माझ्यावर अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत आणि प्रेशर तर कधीच दिलं नाही.आज बोर्डाच्या परिक्षांना मुलांपेक्षा पालकांचं वाढलेलं ब्लडप्रेशर पाहून मला मळमळतं. किती ती अघोरी चिंता, जगू दे की त्या मुला-मुलींना हवं तसं- हे मनापासून सांगावंसं वाटतं.
पुन्हा बॅक टू कराटे, त्या काळी आमच्या कराटेच्या क्लासमध्ये मुलं-मुली एकत्र होती. मुलींना मुलांसोबत फाईट्स म्हणजेच लढत करावी लागे. दंगल म्हणूया त्यालाच. मुलं-मुली या दंगली करत.योग्य ती काळजी घेत आणि मुलगी आपल्याशी फाईट करतेय याचा कुठलाही गैरफायदा न घेत मुलं आमच्याशी फाईट करायची. मुली कमी होत्या त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. टुर्नामेंटच्या तयारीसाठी फाईट्सची प्रॅक्टिस करणं महत्वाचं असतं.त्यामुळे रोजच या फाईट्स असत.तीन-चार तास रगडून व्यायाम होत असे.कधी गुडघा फुटे तर कुठे ना कुठे छोट्या जखमा होतच असत. हातांना नेलपॉलिश कधीच नसायचं पण हाताचा मागचा भाग चांगलाच खडबडीत व्हायचा कारण डीप्स मारताना नकल्स मजबूत होणं गरजेचं होतं.त्याशिवाय पंच मारताना ताकद कशी येणार? एकंदर किकबॉक्सिंग जोरात सुरु होतं.या खेळातही नजर अत्यंत शार्प हवी तरच समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर आपण मात करू शकतो.
सगळा खेळ नजरेत आणि डावपेचात.'दंगल'मधल्या चारही मुलींनी कमालीची मेहनत घेतलेय. झायरा-सुहानी यांचं कोवळेपण आणि नंतरचं रांगडेपण मनाला भावलं. महावीर फोगट यांना हरयाणात त्या काळात ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याची कल्पनाही करता येणार नाही.ज्या हरयाणात स्त्री-पुरुष समानता तर दूरच पण स्त्रियांना चूल आणि मूल यापलिकडे कुठली ओळखही मिळत नाही तिथे मुलगी कुस्ती करणार हे पचणं कठिणच होतं.महावीर फोगट यांनी मुलींना कुस्तीसाठी तयार तर केलंच पण आखाड्यात एका बापाने आपल्या मुलींना मुलांशी लढायलाही लावलं.हे एका पित्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं.पण त्यांचा विश्वास होता त्यांच्या मुलींच्या कर्तबगारीवर. केवळ त्या विश्वासावर त्यांनी मुलींना आखाड्यात सोडलं.गीता आणि बबिता यांच्याबद्दल तर मी काय बोलू? -या गीता-बबिताला भेटले तेव्हाही त्यांचा सच्चेपणा आणि शिस्त पदोपदी जाणवत होती.भारताला कुस्तीत गोल्ड तर यांनी मिळवून दिलंच पण त्याहीपलिकडे अनेक मुलींना क्रिडाक्षेत्रात येण्याची उभारी दिली, प्रेरणा दिली जी सर्वात महत्वाची आहे.महावीर फोगट यांच्याकडून त्या अनेक पालकांनी बुद्धी घ्यावी,की मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत.त्यांनी ठरवलं तर त्या अत्यंत कठिण खेळसुद्धा खेळू शकतात. फक्त खेळच नाही, तर कुठल्याही क्षेत्रात त्या पुरुषांच्या बरोबरीनं उभ्या राहू शकतात.फक्त त्यांना तुमच्या विश्वासाची गरज आहे.


माझं कराटे नंतर सुटलं असेलही, पण आजही मला त्याची खंत नाही कारण मला बाकी अनेक अॅडव्हेंचर्स करण्याची आणि मुख्य म्हणजे कुठल्याही क्षेत्रात झोकून देण्याची ताकद त्या कराटेनं दिली..आणि हो नजरसुद्धा शार्प केली, आपल्या ध्येयावरून ती नजर ढळणार नाही आणि मेहनतीला पर्याय नाही हेही त्या कराटेनंच शिकवलं.
'दंगल' या सिनेमाने माझ्या मनात ही झालेली ही दंगल तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली.मुलींनो आणि त्यांच्या पालकांनो, 'दंगल' एकदा खरंच पहा, मार्ग सापडेल का माहित नाही पण आपल्या मुलींवर ठेवायला हवा तो विश्वास नक्कीच सापडेल.
- Neelima Kulkarni