Monday, March 20, 2017

कविते,

तू माझ्यापासून लांब जा
मला नकोय तुझ्यासोबत समरसून जाणं
तुझ्या दुःखात सामील होणं
आणि मुळूमुळू रडणं
तू कुठल्या जगात राहतेस
मी ज्या जगात राहते तिथे कवितेला स्थान नाही
त्यामुळे तू मला तोंड दाखवू नकोस कधीच
मला नकोय तुझी हळवी आस
साराच भास
आणि नुसता त्रास
जा नं मला कायमची सोडून
मला राहूदे काँक्रिटच्या जंगलात घुसमटत

तुझा समुद्र मला झेपायचा नाही
आणि तुझ्या खिडकीतली काॅफी मला
आयुष्यभर पिता येत नाही..
आणि मध्यरात्री चहासाठी वणवण फिरणंही आताशा नकोसं वाटतं...
तेव्हा मला सोडून जा प्लीज
आता पाऊस पडला तरी त्रास होणार नाही
कारण तू सतत घोंगावत नसशील तेव्हा माझ्या आसपास
तुला कायमचं हद्दपार करुन टाकायचंय..
कविते..तू माझ्यापासून लांब जा आणि मागे वळून पाहू नकोस..कधीच