Tuesday, December 17, 2013

शब्द अपुरे पडतात तेव्हा…

सगळंच 140 अक्षरांमध्ये कसं सांगणार ट्विटर राव…
ते घाव इतक्या तुटपुंज्या शब्दांत मावणार नाहीत आताशा..
ते घाव त्या निर्भयावर होते…
ते घाव त्या नकोशीवर होते…
ते घाव त्या दामिनीवर होते…
हरयाणातल्या त्या कुमारिकेवर होते…
तर खैरलांजीतल्या प्रियांकावरही केलेले ते निर्घृण घाव होते…
बलात्काराला जात नसते, पण स्त्री ही एकमेव जात उरतेच ना तरीही…
पृथ्वीच्या अंतापर्यंत तरी !
माणुसकी हा चार अक्षरांचा शब्द डिलीट होत चाललाय ट्विटर राव…
तू एकशेचाळीस अक्षरांचं काय घेऊन बसलास?

त्या दामिनी… त्या रागिणी शब्दांनी वार तर करत होत्या
पण अपुरे पडले ते शब्द राक्षसी वासनेपुढे…

एकशेचाळीस अक्षरं लांब राहिली रे ट्विटर राव…
एक हुंदका…
तो कसा पोस्ट करू सांग फक्त…

Monday, December 9, 2013

मरण पाहून आल्यावर...

मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा 

विश्वास उडतो की दृढ होत जातो ?


उसवलेल्या धाग्यांची गुंतागुंत वाढते की तुटलेपणाची जाणीव आणखीनच विषण्ण करते ?

मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,

तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला 
कधी काळी दिलेला विसावा …. 

मरण भयानक असतं की अधिकच शांत ?

ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?

मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक … 
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !

मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की  नको इतकं सोपं ?

प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!

-Neelima Kulkarni