Saturday, December 24, 2016

मुलगी आहे ना, मग डान्स क्लासला पाठवा



मी: 'माझ्या शाळेत उद्यापासून कराटेचा क्लास सुरु होतोय,मला जायचंय.'
आई - 'ओके'

एवढा आणि इतकाच संवाद मी पाचवीत कराटेचा क्लास सुरु करायच्या आधी झाला.आमच्या पुण्यात एकदा एका नातेवाईकांनी खोचकपणे 'अग,भरतनाट्यमचा क्लास लाव ना, कराटे करून काय करणार?'
असं बोलून पाहिलं पण आई माझी ठाम होती, 'ती असलं काही करणार नाही, तिला हवं ते तिला करू दे.' असं लगेच सांगून टाकलं.
बाबांनी तर स्वत:च मला तिसरीत असताना स्विमिंग पूलमध्ये सोडलं आणि नाकातोंडात पाणी जाऊन , आधी पुरती घाबरून,मग सावरून हळूहळू पोहायला शिकले.
आमच्या पुण्यात प्रत्येक पेठेत दोन-तीन भरतनाट्यमचे आणि एखादा कथ्थकचा क्लास होताच, त्यात माझ्या वर्गातल्या काही मुलीदेखील लहानपणापासून या डान्सक्लासला जायच्या.
मला कधीच असं वाटलं नाही. पण पुण्यातील त्या मध्यमवर्गीय कोशात त्यावेळी मुलगी झाली की भरतनाट्यमचा क्लास आणि मुलगा झाला की क्रिकेटला पाठवा, अशी पद्धत तेव्हा होती.
'दंगल' पाहिल्यानंतर मीही हरवून गेले माझ्या बालपणीच्या दिवसांमध्ये.हरयाणा तर दूर राहीलं, पण पुण्यातसुद्धा 'मुलीला कराटे का शिकवताय' वगैरे प्रश्न काही पांढरपेशा चेह-यांना पडायचे आणि माझ्या पालकांनी कधीच त्यांना गंभीरपणे घेतलं नाही याचा मला अभिमान आहे.पाचवी ते दहावी कराटे, स्विमिंग, डॉजबॉल, बॅडमिंटन या सगळ्यांत मी स्वच्छंदीपणे रमले आणि दहावी संपताना ब्लू बेल्ट घेऊन गेले.अकरावीत कॉलेजमधून एनसीसी आणि आतंरमहाविद्यालयीन क्रिकेट सुद्धा खेळले.सगळं उत्तम आणि मजेत सुरु होतं.आई-बाबा आपली मुलगी खेळते पण अभ्यास सुद्धा करतेय ना,मग ठिक आहे यात आनंदी होते.यापलिकडे त्यांनी कधीच माझ्यावर अवाजवी अपेक्षा ठेवल्या नाहीत आणि प्रेशर तर कधीच दिलं नाही.आज बोर्डाच्या परिक्षांना मुलांपेक्षा पालकांचं वाढलेलं ब्लडप्रेशर पाहून मला मळमळतं. किती ती अघोरी चिंता, जगू दे की त्या मुला-मुलींना हवं तसं- हे मनापासून सांगावंसं वाटतं.
पुन्हा बॅक टू कराटे, त्या काळी आमच्या कराटेच्या क्लासमध्ये मुलं-मुली एकत्र होती. मुलींना मुलांसोबत फाईट्स म्हणजेच लढत करावी लागे. दंगल म्हणूया त्यालाच. मुलं-मुली या दंगली करत.योग्य ती काळजी घेत आणि मुलगी आपल्याशी फाईट करतेय याचा कुठलाही गैरफायदा न घेत मुलं आमच्याशी फाईट करायची. मुली कमी होत्या त्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. टुर्नामेंटच्या तयारीसाठी फाईट्सची प्रॅक्टिस करणं महत्वाचं असतं.त्यामुळे रोजच या फाईट्स असत.तीन-चार तास रगडून व्यायाम होत असे.कधी गुडघा फुटे तर कुठे ना कुठे छोट्या जखमा होतच असत. हातांना नेलपॉलिश कधीच नसायचं पण हाताचा मागचा भाग चांगलाच खडबडीत व्हायचा कारण डीप्स मारताना नकल्स मजबूत होणं गरजेचं होतं.त्याशिवाय पंच मारताना ताकद कशी येणार? एकंदर किकबॉक्सिंग जोरात सुरु होतं.या खेळातही नजर अत्यंत शार्प हवी तरच समोरच्या प्रतिस्पर्ध्यावर आपण मात करू शकतो.
सगळा खेळ नजरेत आणि डावपेचात.



'दंगल'मधल्या चारही मुलींनी कमालीची मेहनत घेतलेय. झायरा-सुहानी यांचं कोवळेपण आणि नंतरचं रांगडेपण मनाला भावलं. महावीर फोगट यांना हरयाणात त्या काळात ज्या संघर्षाला सामोरं जावं लागलं त्याची कल्पनाही करता येणार नाही.ज्या हरयाणात स्त्री-पुरुष समानता तर दूरच पण स्त्रियांना चूल आणि मूल यापलिकडे कुठली ओळखही मिळत नाही तिथे मुलगी कुस्ती करणार हे पचणं कठिणच होतं.महावीर फोगट यांनी मुलींना कुस्तीसाठी तयार तर केलंच पण आखाड्यात एका बापाने आपल्या मुलींना मुलांशी लढायलाही लावलं.हे एका पित्यासाठी सोपं नक्कीच नव्हतं.पण त्यांचा विश्वास होता त्यांच्या मुलींच्या कर्तबगारीवर. केवळ त्या विश्वासावर त्यांनी मुलींना आखाड्यात सोडलं.गीता आणि बबिता यांच्याबद्दल तर मी काय बोलू? -या गीता-बबिताला भेटले तेव्हाही त्यांचा सच्चेपणा आणि शिस्त पदोपदी जाणवत होती.भारताला कुस्तीत गोल्ड तर यांनी मिळवून दिलंच पण त्याहीपलिकडे अनेक मुलींना क्रिडाक्षेत्रात येण्याची उभारी दिली, प्रेरणा दिली जी सर्वात महत्वाची आहे.महावीर फोगट यांच्याकडून त्या अनेक पालकांनी बुद्धी घ्यावी,की मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत.त्यांनी ठरवलं तर त्या अत्यंत कठिण खेळसुद्धा खेळू शकतात. फक्त खेळच नाही, तर कुठल्याही क्षेत्रात त्या पुरुषांच्या बरोबरीनं उभ्या राहू शकतात.फक्त त्यांना तुमच्या विश्वासाची गरज आहे.


माझं कराटे नंतर सुटलं असेलही, पण आजही मला त्याची खंत नाही कारण मला बाकी अनेक अॅडव्हेंचर्स करण्याची आणि मुख्य म्हणजे कुठल्याही क्षेत्रात झोकून देण्याची ताकद त्या कराटेनं दिली..आणि हो नजरसुद्धा शार्प केली, आपल्या ध्येयावरून ती नजर ढळणार नाही आणि मेहनतीला पर्याय नाही हेही त्या कराटेनंच शिकवलं.
'दंगल' या सिनेमाने माझ्या मनात ही झालेली ही दंगल तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली.मुलींनो आणि त्यांच्या पालकांनो, 'दंगल' एकदा खरंच पहा, मार्ग सापडेल का माहित नाही पण आपल्या मुलींवर ठेवायला हवा तो विश्वास नक्कीच सापडेल.
- Neelima Kulkarni 



Wednesday, May 11, 2016

वाट ही सैराट!


आर्ची माझ्या फिल्मची हिरो आहे.आर्ची रूढार्थाने सुंदर नाही, गोरीही नाही,पण ती सशक्त आहे.ती तिचं मन बोलून दाखवते ..हे उद्गार आहेत सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेचे...रिंकू राजगुरूबद्दलचे... सैराटच्या आर्चीबद्दलचे....
खरंच सैराटची आर्ची सध्या महाराष्ट्राची सुपरस्टार झालीय..नुकताच तिला सैराटमधील अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला..तेही वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी...तिच्या पहिल्यावहिल्या सिनेमात तिने प्रेक्षकांवर जादू केलीय..समीक्षकही तिच्यावर तिच्या सहज अभिनयाबद्दल कौतुकाचा वर्षाव करतायत...पिटातले प्रेक्षक तर घायाळ झालेच आहेत पण बाल्कनीतल्या नजराही तिच्यावरच खिळल्या आहेत...

गोरी, सुंदर, सुडौल बांध्याची अहो म्हणजेच झिरो फिगर किंवा एकदम टिपटॉप फॅशन पाळणारी, ग्लॅमरस लूक असणारी, नखापासून केसापर्यंत सर्वकाही टीपटाप आणि लेटेस्ट ट्रेंड असलेलं...या संकल्पनेत आपण वर्षानुवर्षं सिनेअभिनेत्रींना पाहात आलोय ...फार तर दहा टक्के वरखाली..पण अपेक्षा साधारण अशाच...आणि निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी याच मागण्या पुढे करत अनेक मुलींना ऑडिशननंतर नकारही दिलाय. रिंकू या सगळ्या संकल्पना मोडीत काढते, या सर्व ग्रहांना छेद देते आणि आत्मविश्वासाने समोर उभी राहते...
खूप कमी दिग्दर्शक हे आव्हान स्विकारायला सज्ज होतात ..सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेनं नेहमीच नव्या चेह-यांना संधी दिलीय..पण रिंकू या संधीचं सोनं करते आणि आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते..
मराठी सिनेमात स्मिता पाटील नावाचं वादळ आलं आणि त्यानंतर पुन्हा या संकल्पनांना छेद देण्याचे प्रयत्न काही वेळा झाले..पण रिंकूने अवघ्या पंधराव्या वर्षी साधलेलं यश थक्क करणारं नक्कीच आहे...

बॉलिवूडमध्येही काही अभिनेत्री हेच स्टिरिओटाईप मोडण्याचा प्रयत्न करताना दिसतात...नुकताच कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला तो तनू वेड्स मनू रिटर्न्समधील तनू आणि दत्तो या दुहेरी भूमिकांसाठी...या डबलरोलमधली दत्तो फारच वेगळी होती... ॲथलेटचं करियर करणारी, दात पुढे असलेली, बॉयकटमध्ये दिसणारी, हरियाण्वी भाषेत बोलणारी चुलबुली दत्तो प्रेक्षकांना भावली.एवढंच नाही तर एवढ्या ताकदीचे डबलरोल यापूर्वी कुठल्याही अभिनेत्रीला पेलता आले नाहीत अशाही काहींनी प्रतिक्रिया दिल्या.कंगनाचा हा पहिलाच वेगळा प्रयत्न नव्हता..याआधी क्वीनमध्येही तिने स्मॉल टाऊन गर्ल अगदी सामान्य जीवन जगणारी रानी साकारली.कंगनाला या सिनेमासाठीदेखील राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आणि प्रेक्षकांनी दिलेला हाऊसफुल्ल प्रतिसादसुद्धा... प्रवाहाविरुद्ध जात कंगनाने आपला वेगळा ठसा उमटवला आणि आज सर्वाधिक मानधन घेणा-या अभिनेत्रींमध्ये कंगना आघाडीवर आहे.

यावर्षी आणखी एका उल्लेखनीय भूमिकेसाठी कलकी कोचलीनने परीक्षक पसंतीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ या सिनेमात सेरेब्रल पाल्सी झालेल्या, समलैंगिक जाणीवा असलेल्या लैलाची भूमिका कलकीने साकारली.हे आव्हान नक्कीच सोपं नव्हतं..यापूर्वीही कलकीने स्टिरिओटाईप ग्लॅमडॉल भूमिकांना छेद दिला होता पण मार्गारिटामध्ये दिसलेली कलकी वेगळीच होती...यात तिने शारिरिक आणि वाचिक या दोन्ही बाजूंवर कठोर मेहनत घेतली होती.एका आघाडीच्या अभिनेत्रीसाठी ही भूमिका नक्कीच मोठी रिस्क होती पण कलकीने ती स्विकारली आणि उत्तम रित्या पेलली.

ग्लॅमरस अवताराला पुन्हा एकदा बाय बाय केलं ते दिपिकाने ..दीपिकाने मागील वर्षी सिक्सर मारला तो पिकू साकारून...स्वावलंबी, चिडचिड करणारी,सतत वैतागलेली परंतु तरीही भावूक असलेली बंगाली बोलणारी पिकू प्रेक्षकांना आपल्या घरातलीच वाटली... यशाच्या शिखरावर असलेल्या दिपिकाने हा स्मॉल बजेट सिनेमा स्विकारला, शूजीत सरकारचं दिग्दर्शन आणि सोबत अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांसारखे ताकदीचे कलाकार...दिपिकासाठी ही वाट सोपी नक्कीच नव्हती..पण तिची भूमिकेवरची पकड पक्की होती..आणि यामुळे दिपिकाने यशाची सेंच्युरी मारली.. 2015 चे जवळपास सगळे पुरस्कार दिपिका घेऊन गेली.

असाच एक वेगळा प्रयत्न मागील वर्षी रिचा चढ्ढाने केलेला दिसला...नेहमी बोल्ड भूमिकांमध्ये दिसणारी रिचा मसान या सिनेमात मेकअपशिवाय दिसली..वाराणसीतल्या एका सामान्य कुटुंबात वाढलेली देवी पाठक रिचाने साकारली .या सिनेमाला कान फेस्टिव्हलमध्ये दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवलं गेलं आणि रिचाच्या कामगिरीचंही भरभरून कौतुक झालं..छोट्या बजेटच्या या वेगळ्या वळणावरच्या सिनेमात रिचाला काहीतरी भन्नाट दिसलं आणि दिग्दर्शकावर विश्वास ठेवून तिने मसान स्विकारला.मसानसाठी तिला स्टारडस्ट पुरस्कारही मिळाला.

एकंदर या चंदेरी दुनियेच्या लखलखाटात वावरताना काही अभिनेत्री मुखवट्यांमागचा खरा चेहरा शोधण्याचा प्रयत्न कसोशीनं करताना दिसतायत ,एकापेक्षा एक वेगळ्या भूमिका साकारतायत आणि त्यात यशस्वीदेखील होतायत..त्यांचा  यापुढील प्रवासही असाच सैराट होऊ दे याच शुभेच्छा

- नीलिमा कुलकर्णी IBN लोकमत

Sunday, March 6, 2016

एन्ड्युरोचा थरार आणि वाट चुकलेला वाटसरू

खूप दिवसांनी लिहितेय,पण हे सांगायलाच हवं..पुण्यात एन्ड्युरोच्या थरारक स्पर्धेत भाग घेतला तेव्हा एक गोष्ट मनात घर करून राहिली.डोणजे गावातून आम्ही सायकलस्वार निघालो.IBN लोकमतच्या आमच्या तीन टीम मंदार फणसे सरांच्या प्रोत्साहनामुळे सहभागी झाल्या.सायकलींग,माऊन्टन बायकींग आणि ट्रेकिंग..सायकलींगची तयारी जोरदार सुरू होती पण माऊन्टन बायकींगचा अनुभव शून्य होता.त्यानंतर सिंहगड पाऊलवाटेने चढून उतरायचाही होता..पाय-यांच्या सोप्या मार्गाने नाही.तरीही तयार झालो आणि स्पर्धा पूर्ण करायचीच अशी जिद्द उराशी बाळगली.सायकली निघाल्या,आरोळ्या ठोकल्या..अमाप उत्साह आणि अफाट ऊर्जा..सुरुवात तर एक नंबर झाली.
मग चढावर चढ दिसायला लागले..हे होतं माऊन्टन बायकिंग..हा शब्द फार आकर्षक वाटतो पण सायकली उचलत एकेक टप्पा ओलांडणे आणि सायकली दामटवत चढणे हे चांगलंच दम काढणारं होतं.नंतर सुरू झाला चित्तथरारक खेळ...प्रचंड खडबडीत वाळूच्या वाटेवर खोल उतारावर सायकल चालवणे..पडलात तर कपाळमोक्ष किंवा एक फ्रॅक्चर नक्कीच.मग खरा कस लागला सायकलिंग कौशल्याचा...विचार करायला पण उसंत नव्हती..एवढा खोल उतार होता कितीतरी काळ की फक्त बॅलेन्सिंगवर भर देत पुढे जायचं होतं...असे कितीतरी किलोमीटर्स रेटले एकदाचे..खाली आल्यावर वाटलं सुटलो,संपला असावा सायकलिंगचा टप्पा पण कसलं काय नंतर एक पक्का रस्ता लागला..पिक्चर अभी इंटरवल तक भी नही आया था.टळटळीत उन्हात सायकल चालवणं सुरूच होतं.शरीरातले सगळे अवयव बोलू लागले होते पण चले चलो हा मनाचा हिय्या ठाम होता.कसेबसे पुढील 30किमी पार केले..एन्ड्युरोचे volunteers हात करताना दिसले तेव्हा कळलं पहिला टप्पा आपण पार केला.पण खरी लढाई पुढे होती.पाणी पिण्याचा ब्रेक झाला आणि पाच मिनिटांत आमची टीम पुढे निघाली.सिंहगड पाऊलवाटेने चढायला सुरुवात झाली. पुन्हा चले चलो...मग पुढील एक तास गेला..कळस अजूनही खूप लांब होता..दमण्याच्या पलिकडची अवस्था काय असते ते कळायला लागलं होतं.ही सगळी गंमत वरून सूर्यमहाशय एकटक पाहत होते.का आपण हे आव्हान स्विकारलंय,वाटेत मिडियाच्या दुस-या दोन टीम्सने कच खात स्पर्धा सोडून दिल्याचं याचि देही याचि डोळा पाहिलं होतं.ते हुशार होते,त्यांना वेळेत कळलं असेही विचार मनात येऊन गेले.आधीच आपला जीव काय,आपण करतोय काय या सगळ्या विचारांनी मनाला ग्रासलं होतं,तनाची तर विकेट गेली होती.आता चक्कर येणार आणि आपण धीर सोडणार असं वाटत असतानाच तो वाटसरू दिसला आणि डोळे खाडकन् उघडले.साधा शर्ट-पॅण्ट घातलेला एक तिशीतला माणूस अनवाणी उभा होता.शेजारी त्याचे चामड्याचे जीर्ण झालेले बूट.पाय बूट चावल्यामुळे रक्ताळलेला आणि तो क्षणभर विश्रांतीसाठी तसाच उभा.बाकी सगळे स्पर्धक सोडून हा एकटाच असा दिसला मंदार सरांनी त्याची विचारपूस केली तेव्हा कळलं हा बिचारा सिंहगड चुकून या पाऊलवाटेनं चढला.पाय-यांचा सोपा मार्ग त्याला सापडला नाही आणि तो या कठीण मार्गाने निघाला.वाटेत त्याला कळलं आपण साफ चुकलोय.तो आमच्यासारखा स्पर्धेत सहभागी नव्हता ना त्याने आमच्यासारखे सायकलचे हेल्मेट,आदिदासची ट्रॅकपॅण्ट टीशर्ट अन् स्पोर्ट शूज घातले होते.तो आपला सहज सुट्टीच्या दिवशी सिंहगड पहावा म्हणून पहिल्यांदाच आला आणि त्या खडतर वाटेने आणि चामड्याच्या बुटांनी त्याला पुरतं असहाय्य केल.त्यात आणखी एक कळलं त्याच्या पायात दोष होता पण तरीही तो खचला नाही.स्मितहास्य करत तो म्हणाला 'जायेगा,पुरा करेगा'.आणि आम्हाला त्याने स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या.कोण होता तो,का भेटला आम्हाला आणि काय उभारी देऊन गेला आम्हाला काय माहीत.त्याला पाणी दिलं आणि आम्ही पुढे निघालो.बाकी कोणतीच मदत त्याला नको होती.त्याला पाहिलं आणि स्पर्धा सोडण्याचे सगळे विचार खळ्ळकन् गळून पडले.आम्ही पुढील अर्धा टप्पा पूर्ण केला आणि परत उतरायला लागलो तेव्हाही आम्हाला तो वाटसरू दिसला.यावेळी त्याच्या चेह-यावर आनंद होता.त्याने गड सर केला तसाच अनवाणी पायांनी आणि आता तो उतरायला सुरुवात करत होता.त्याला सलाम ठोकला आणि आम्ही पुन्हा निघालो झपापझप पुढे.खाली आलो,एन्ड्युरेच्या टीमने जोरदार स्वागत केलं.आमची मित्रमंडळीही आमचं कौतुक करत होती.आमच्यासारख्या beginnersसाठी हा खरंच अत्यंत आनंददायी क्षण होता.आम्ही पहिल्या तीनात बाजी मारली.मेडल मिळालं.सगळं हवं तसं झालं पण लक्षात राहिला तो वाट चुकलेला वाटसरू आणि त्याचा हसरा चेहरा.