Friday, May 15, 2020

#cinemagully

#MadhuriDixit

#HappyBirthdayMadhuri

‘वो तुम्हें बतायेगा...’ या पिढीतलीच मी सुद्धा....

‘कहीं ना कहीं कोई ना कोई हर एक के लिए बना है... वो तुम्हें बतायेगा’... ‘दिल तो पागल है’ मधील माया हे म्हणते...आणि बास, या फिलॉसॉफीवर शिक्कामोर्तब आपला...

माधुरी म्हणाली, विषय एण्ड!

आजकालच्या टिंडर फिंडरच्या जगात नाहीच मी तरुणाईत आले ते बरंच झालं...

‘वो तुम्हें बतायेगा’च्या आशेवर ड्रीमी राहत जगणं माधुरीनेच शिकवलं... आणि ‘हम को आज कल है इंतजार, कोई आये लेके प्यार....’ हे सुद्धा...

आणि मग, ‘पालखी में होके सवार चली रे’…

माधुरीवर आजन्म फिदा असणा-या 90sच्या पिढीतील मुलींची हीच स्टोरी....

ते धक धक वगैरे ठिक आहे...मुलं होतं असतील बेजार ते पाहून...

पण मी मात्र ‘वो तुम्हें बतायेगा’ च्या मायावर जास्त खूष होते... आणि ‘उहूहू उह्हू’ सुदधा… ‘हम आपके है कौन’ तर सूरज बडजात्याच्या एडिटरने सुद्धा पाहिला नसेल इतका प्रत्येक सीन जीव ओतून ओतून अनेक काळ पाहिलाय....

माधुरीच्या चाहत्यांच्या अशा अनेक भन्नाट किस्से असतीलच... असणारच... माधुरी त्या सर्वांना पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे...

ती नेहमी तितकीच मोहक आणि भूरळ पाडणारी वाटत आलेय...

अर्थातच माधुरीच्या गाण्यांवर घरात टिव्हीसमोर वाट्टेल तसं नाचताना आणि एकदंरच करियरचा जो उजेड पडला होता त्या काळात मला काही आयुष्यात वाटलं नव्हतं की मी तिला कधी प्रत्यक्ष भेटू शकेन...

पण शेवटी दिल तो अपना भी पागल है....

सिनेपत्रकारितेत आले, आणि तरीही काही वर्षं लोटली तरी हा मधुरयोग यायला वेळ लागलाच...

मग 2013 मध्ये ये जवानी है दिवानीचं रणबीर आणि तिचं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं होतं..तेव्हा एका मुलाखतीचा योग आला...

तोवर खरंतर पत्रकारितेत नीट मुरलेली मी..पण त्यादिवशी दिल धकधक नाही धाडधाड करत होतं...

कारण काम आणि इमोशन एकत्र आलं होतं... अर्थात स्वत;ला सावरणं आलंच...

एक मुलाखत सुरु होती... समोर माधुरी दिक्षित मी याची देही याची डोळा पाहत होते... त्यानंतर माझा नंबर होता... मी 1000 पटीने धडधडत असणा-या हृदयाला शांत करत होते.. आणि जे घडू नये ते घडलं...

आधीची मुलाखत संपली ...आणि कोप-यात वाट पाहणा-या माझ्याकडे पाहून माधुरी हसली...

इथवर स्वत;ला सावरू पाहणारी मी पुन्हा खल्लास!

माधुरीच्या मिलेनियम स्माईलचं कौतुक उगाच नाही करत अहो सगळे.... ती हसली की थेट खेळ खल्लासससससस होतो...!

मग मी दिर्घ श्वास घेत.’.......नूरनजर मोहोतरमा मोहिनी...आणि बरंच काही म्हणत पल्लेदार ओपनिंग केलं मुलाखतीचं...आणि त्यावर माधुरी छानशी हसली आणि त्या काळात तिने दिलेली ती पहिली मराठीतली मुलाखत ठरली...याआधी कार्यक्रमांमध्ये थोडंफार ती बोलली असेल पण माधुरीने मुलाखत देणं 2013 च्या काळात फारच कमी वेळा झालं..त्यात बाकी मुलाखती हिंदी किंवा इंग्रजी असत.त्यामुळे माधुरी मराठी-हिंदी मिश्रित बोलली आणि मुलाखत सुपरहिट सुद्धा झाली.

मी थरथरत फोटोसाठी विचारलं...तिने मला छान जवळ घेत फोटोही काढला... आता आकाश ठेंगणं झालं होतं...

मी व्हायोलीनच्याच ट्यूनमध्ये घरी आले होते..बाकी सगळं धूसर झालं होतं... ही माझी पहीलीवहीली भेट...माधुरी –मराठी आणि मी...

मग काही वर्षं लोटली, तोवर इव्हेंट्समध्ये वगैरे माधुरीची झलक अनेक वेळा होत होतीच...

पण पुन्हा मुलाखतीचा योग थेट बकेटलिस्टला आला..आणि माझी दुस-यांदा तिला भेटायची बकेटलिस्ट पूर्ण झाली.

मग काय, यावेळी तर मी मोदक आणि पुरणपोळीसह महबूब स्टुडिओमध्ये हजर होते...वेळेच्या आधीच...

माधुरी आली, शुभा खोटे ताई आणि वंदना गुप्ते ताईसुद्धा होत्या.. मोदक-पुरणपोळी पाहून माधुरी थक्क... आणि पुन्हा गोड स्माईल...यावेळी मुलाखतीत तिचं मराठीपण अधिक अधोरेखित झालं... तिला महाराष्ट्रीयन पदार्थ किती आवडतात इथपासून ती स्वत;सुद्धा किती उत्तम स्वयंपाक करते हे सगळंच बोलणं झालं... माधुरी अगदी दिलखुलासपणे मराठीत बोलत होती.. मग पुन्हा एकदा माधुरीची वेगळी एकटीची मुलाखतही झाली.त्यात मी तिला अनेक प्रश्न विचारले ज्यांची तिनं मोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी मृत्यूदंड, यामधली कणखर माधुरीबद्दलही विचारलं आणि मग त्या भूमिका जास्त का केल्या नाहीत असंही विचारलं...तेव्हा माधुरी मनमोकळेपणाने म्हणाली, मी प्रयोग करत होते, सर्वप्रकारे भूमिका केल्या .. जे प्रेक्षकांना आवडलं ते त्यांनी स्वीकारलं...

मला वाटतं, माधुरीचे एवढेच साधंसोपं लॉजिक होतं... प्रेक्षकांना जर ती मोहक, सुंदर, दिलखेचक आणि सदैव आकर्षकच वाटत गेली तर त्यात तिचा दोष नाहीच..उलट ती तिची बलस्थानं होती.. माधुरी एका पहाटेच्या स्वप्नासारखी सुखद वाटणं हेच तिचं यश होतं...आणि तेच तिला यशाच्या शिखरांवर नेत गेलं....

यानंतर मागील वर्षीच माधुरी आणि श्रीराम नेने य दोघांसोबत मुलाखत झाली.तेव्हा दोघांच्या उत्तम सहप्रवासाविषयी कळलं....

‘मोहोब्बत क्या है’ असं मी विचारलं आणि ‘जिंदगी’ हेच अपेक्षित उत्तर माझ्या लाडक्या माधुरीने दिलं...

यासोबत ‘टू फ्री देम’ हे सुद्धा माधुरी बोलली जे फारच अनमोल होतं... ‘ज्याच्यावर प्रेम करताय त्याला मुक्त ठेवा...तो तुमच्यावर अधिक प्रेम करेल’ यावेळी बात गहरी हो गयी मामू....

माधुरीने थोडक्यात पण फार भारी उत्तर दिलं.

डॉ.श्रीराम नेनेंना मी विचारलं, की ‘अहो, आमच्यासाठी या मोहिनी,माया,निशा आहेत,,,पण तुमच्यासाठी फक्त माधुरी आहेत... मग असं काय तुम्हाला तेव्हा पसंत पडलं, ते तरी सांगा आम्हाला?’

यावर त्यांनी लांबलचक उत्तर दिलं...की हो,’मी तर तिचा एकही सिनेमा पाहिला नव्हता, लोकांसाठी ती द माधुरी होती, माझ्यासाठी ती एक साधारण मुलगी होती,जिच्या स्वभावाच्या मी प्रेमात पडलो.’...

घ्या, इथे जे लाखो करोडो आशिक तिच्या लग्नाच्या बातमीनंतर हार्टफेल होत आसवं गाळत होते त्यांनी ऐका जरा...

थोडक्यात काय, तर ‘माधुरी इज माधुरी’

माधुरीने मागील वर्षी म्हणजेच तिच्या वयाच्या 52व्या वर्षी मुंबईच्या आयफामधील केलेला 9 मिनिटांचा नॉनस्टॉप परफॉर्मन्स मी स्टेडियममध्ये पाहीला.. जो तिने सरोज खान यांना समर्पित केला..ज्यात माधुरीची सगळी सुपरडुपरहीट गाणी तिने स्वत:च सादर केली.,ती ही उत्तम अशा कोरिओग्राफीसह, कोणत्याही कमी हालचाली न करत फुल एनर्जी फुल ऑन स्पिरिटेड आणि सगळ्या बारकाव्यांसह....

अख्खं स्टेडियम पुढील 5 मिनिटं उभं राहून फक्त टाळ्या वाजवत होतं...आणि त्यात मीही पामर होते...

तितकीच थक्क, अचंबित आणि माझ्या लहानपणीच्या आणि आत्ताच्या ‘माया’कडे पाहात…माधुरी इज माधुरी!

(ता.क – आज वाढदिवसाच्या शुभेच्छा माधुरीला ट्विटरवर दिल्या तेव्हा माधुरीने ट्विटरवर रिप्लाय केलाय आणि मी पुन्हा तरंगतेय)

- Neelima Kulkarni