Wednesday, July 1, 2009

सी लिंक..गेट सेट गो


‘अजि म्या ब्रह्म पाहिले…’या ओळी म्हणताना जितकं काही विस्मय,कौतुक,कुतुहल, या सर्व संमिश्र भावना यांचा कोलाज चेह-यावर रेखाटला जातो ते सर्व काही मी अनुभवलं..खरंच! आज प्रत्येक मुंबईकराची छाती अभिमानानं भरून येईल असा रत्नहार खरोखरच अस्तित्वात आलाय वांद्रे ते वरळी सी लिंकच्या रुपात.

वेग हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कितीही आपत्ती आली तरी मुंबईकर कोणासाठी थांबत मात्र नाहीत.मुंबईकरांची हीच गती ओळखून तयार करण्यात आलाय तो हा सागरी सेतू. कित्येक दिवस याबाबतच्या बातम्या कानावर पडत होत्या.न्यूजचॅनलमध्येच काम करत असल्यामुळे वारंवार दिसतही होत्या.त्यामुळे उत्सुकता दिवसागणिक वाढत होती,हे नक्की.सोमवारी रात्री सी लिंकचा लेझर शो पाहिला तेव्हा तर उत्सुकता शिगेला पोहोचली.पण ‘याचि देही याचि डोळा’ पाहिल्याशिवाय समाधान काही होत नव्हतं.बुधवारी सकाळी ७ वाजता सेतू सर्वांसाठी खुला होणार हे कळताच आदल्या रात्रीपासून सुरू झालं प्लॅनिंग..सकाळी चॅनलच्या गाडीतून ऑफिसला यायचं ते सी लिंकवरूनच हा निश्चय पक्का होता.त्याचप्रमाणे मोठ्या टेचातच ड्रायव्हरला सांगितलं की ‘बांद्रा सीलिंकपर गाडी घुमाओ...’ हूरहूर वाढतच चालली होती.पावणे सात वाजता इच्छित स्थळी पोहोचताच नजरेस आला तो पोलिसांचा जोरदार बंदोबस्त, मीडियाची गर्दी (स्टार माझाच्याही कॅमे-याची त्यात भर होतीच) आणि चारचाकी वाहनांची रांगही!

आमचा ड्रायव्हर आमच्यापेक्षा उत्साही,उजव्या बाजूने वाट काढून त्याने सर्वात कोप-यात आमची गाडी उभी केली.सातचे ठोके पडले ( की नाही कुणास ठाऊक कारण घड्याळाकडे कोण पाहतंय) नजर भिरभिरत होती ती सी लिंकच्या प्रवेशाकडे..अचानक पोलिसांनी शिट्टी वाजवली...गाड्यांमधील मुंबईकरांनी आरोळी ठोकली.. आणि धूsssssssssssssम
आम्ही सी लिंकवरून जात होतो...तो नजरेत मावत नव्हता..गाडीनं वेग पकडल्यामुळे मस्त वारं वाहत होतं..आणि त्या 5 मिनिटाच्या सफरीत काय पाहू आणि काय नको असं झालं होतं.अख्खं निळंशार आकाश ठेंगणं भासू लागलं,जणू कवेत घेतल्याप्रमाणे...खाली समुद्र शहारत होता. आकाश आणि समुद्राच्या मधोमध ही सफर क्षणोक्षणी रंजक होत चालली होती.वाटायचं थांबूच नये..हा प्रवास असाच चालत राहावा.तो वेग,ती भव्यता,ते कुतुहल..सगळं काही. तद्दन शहरी असून आणि आतापर्यंत हिंदी सिनेमांमध्ये परदेशातील असे कित्येक ब्रीज पाहूनही मी हरखले. त्या भव्यतेचं विस्मय होतंच पण त्याही पलिकडे अभिमान होता तो हे भारतात अवतरलंय याचा.26 नोव्हेंबरला मुंबईचा ताज नष्ट करू पाहणा-यांना दाखवून देण्याचा की पाहा,आमच्या मुंबईत हा नवा रत्नहार अवतरलाय.मुंबई अशा संकटांनी कधीच खचणार नाहीए तर ताठ मानेने पुन्हा पुन्हा उभी राहणार आहे नव्या आव्हानांसह,नव्या चेतनेसह!
मग या नव्या राईड विथ प्राईडचा अनुभव घ्यायला सज्ज होणार ना...गेट सेट गो !!