Sunday, August 11, 2019

पावसात वाहून गेलेल्या कवितांचं काय करायचं...
कधीच फुटला भावनांचा बांध
कोरडे ठक्क झाले अश्रू
लिहिली होती मीही एक कविता
पाऊस चिंब मनातला वगैरे
आणि इथे पावसाने जीवघेणं थैमान घालून ठेवलंय
कवितेच्या कागदाचा चोळामोळा झाला
त्या लाखो आयुष्यांसारखा
जी कधी सावरतील याची कल्पना करता येत नाही
कल्पनेतला पाऊस सत्यात का नसतो?
reality strikes ची व्याख्या इतकी बिनतोड
की पावसाचं नाव घेतलं तरी काटा यावा अंगावर

जिथे घरं वाहून गेली त्याच अंगणात
सांग सांग भोलानाथ गायलंच असेल की कुणीतरी
छपरांवर पावसाचा पहिला टपटप आवाज ऐकून मोहरलं असेलच की कुणीतरी...
चातकचोचीने वर्षाऋतू कसा पिणार
इथे वर्षाऋतू गिळून टाकतोय माणसाला
पगडंडी वाहून गेल्यात
राधा-कृष्ण सापडत नाहीएत
सगळंच वाहून गेलंय
गोंद्या...महापूर ओसरत नाहीए
माझी हाक कशी पोचणार कळत नाहीए

reality strikes...reality strikes!
कवितेचा मुडदा पडलाय!
- नीलिमा कुलकर्णी

No comments: