Monday, December 9, 2013

मरण पाहून आल्यावर...

मरण पाहून आल्यावर जगण्यावरचा 

विश्वास उडतो की दृढ होत जातो ?


उसवलेल्या धाग्यांची गुंतागुंत वाढते की तुटलेपणाची जाणीव आणखीनच विषण्ण करते ?

मरणाच्या दारात विसावलेले बंद डोळे उघडणार नसतात कधीच,

तेव्हा आठवतो त्या डोळ्यातला ओलावा आणि त्या डोळ्यांनी आपल्याला 
कधी काळी दिलेला विसावा …. 

मरण भयानक असतं की अधिकच शांत ?

ती शांतता भयावून सोडते म्हणूनच मरण पाहणं कठीण जातं का ?

मरण पाहण्याच्या वेदना आणखीनच मरणांतिक … 
मेलेला मात्र शांत आणि स्तब्ध !

मरण पाहून आल्यावर जगणं अधिक अवघड असतं की  नको इतकं सोपं ?

प्रश्नांची ही गुंतागुंत मेल्याशिवाय काही सुटणार नाही हेच अंतिम सत्य !!!

-Neelima Kulkarni

2 comments:

Milind Joshi said...

हे वाचून वाटलं, मरण हे उत्तर आहे की प्रश्न ?
कविता छान आहे नीलिमा.

Kanchan Karai said...

सुंदर आहे कविता!